नारायणगाव - आघाडीचे फडमालक व वगसम्राट म्हणून नावलौकिक मिळवलेले ज्येष्ठ तमाशा कलावंत चंद्रकांत ढवळपुरीकर (वय 77 वर्षे) यांचे शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजता नारायणगाव येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर काल सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
ढवळपुरीकर यांना दहा वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना श्वसनाचा व मुत्राशयाचा विकार जडला. गेली दोन वर्षे ते अंथरुणावर खिळून होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. उपचारासाठी कर्ज घेतले होते. त्याच्या फेडीसाठी त्यांना घरही विकावे लागले होते. या प्रसिद्ध कलावंताची वृद्धापकाळात उपेक्षा झाली.
अंत्यसंस्कारप्रसंगी आमदार वल्लभ बेनके, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, गफूरभाई इनामदार, मालती इनामदार, किसनराव गायकवाड, कुंदा पाटील पिंपळेकर, हरिभाऊ बढे, कांताबाई सातारकर आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
ढवळपुरीकर यांचा जन्म 1932 साली ढवळपुरी (ता. पारनेर) येथे गरीब कुटुंबात झाला. चंद्रकांत शिवराम जाधव हे त्यांचे खरे नाव होते. मातृछत्र हरपल्याने वयाच्या 13 व्या वर्षी पोटासाठी विष्णू बांगर बेल्हेकर यांच्या तमाशात बिगारी म्हणून त्यांनी कामास सुरवात केली. त्यांनी दहा वर्षे बिगारी, स्वयंपाकी, पाणाड्या, भांडी घासणे आदी कामे केली. पुढे 1955 मध्ये जगताप पाटील पिंपळेकर यांच्या तमाशात त्यांना नाच्याची भूमिका मिळाली. याच तमाशात त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. पिळदार मिशा, गोरा रंग, प्रभावी व्यक्तिमत्त्व पाहून फडमालक तुकाराम खेडकर यांनी 1956 मध्ये त्यांना खलनायक म्हणून संधी दिली. त्यांनी मुंबाजी बुवा, चंद्रराव मोरे, गणोजी शिर्के, दादम भट्ट, रंगमल महाराज, गावचा पाटील या खलनायकाच्या भूमिका केल्या. त्यामुळे महाराष्ट्रात वगसम्राट म्हणून त्यांची ओळख झाली. "पानिपतचा सूड' अर्थात "दिल्लीवर स्वारी", "काळ रक्त', लड्डा सिंग, "गवळ्याची रंभा' आदी शंभर वगांत त्यांनी भूमिका केल्या .
त्यांनी 1964 मध्ये बाबूराव संविदणेकर यांच्या सहकार्याने तमाशा फड सुरू केला. कर्जबाजारी झाल्याने वर्षात फड बंद झाला. पुढे 1966 मध्ये त्यांनी (कै.) दत्ता महाडीक पुणेकर या मित्राच्या सहकार्याने वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडीक पुणेकर या नावाने फड सुरू केला. या तमाशाने त्यांना यशोशिखरावर पोचवले. या कालावधीत त्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले. पुढे 1982 मध्ये त्यांनी वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर या नावाने स्वमालकीचा फड सुरू केला.
महाराष्ट्र शासन, पुणे महापालिकेने त्यांचा गौरव केला. तमाशा क्षेत्रातील सुमारे वीस पुरस्कार त्यांना मिळाले. पक्षाघात व हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्यामुळे दहा वर्षांपूर्वी त्यांनी तमाशात काम करणे बंद केले व त्यांच्या हालअपेष्टेला सुरवात झाली. (कै.) विठाबाई नारायणगावकर यांच्यावरसुद्धा वृद्धापकाळात हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली होती. त्यानंतर हीच अवस्था श्री. ढवळपुरीकर यांची झाली.
शासनाकडून मानधन अखेरपर्यंत नाहीच...
शासनाच्या वतीने वृद्ध तमाशा कलावंतांना मानधन दिले जाते. हे मानधन मिळावे, अशी ढवळपुरीकरांची इच्छा होती. त्यासाठी दहा वर्षे त्यांनी शासनाचे उंबरठे झिजविले. मात्र घर त्यांच्या नावावर असल्याने तुम्हाला मानधन देता येणार नसल्याचे शासन दरबारी सांगण्यात येत होते. या लाल फितीच्या कारभारामुळे मानधन मिळण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.
आता तरी सरकारनि कलावंताना मानधन देवून ढवळपुरीकरांची इच्छा पूर्ण करावी. जेने करुन त्याना भावःपूर्ण श्रधांजलि सरकारला देता येइल. अशी मागणी संजय भाऊ शाह रास्ट्रीय मानवाधिकारी संघटना (भारत) पुणे ज्हिला सरचिट्निश यानि केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment